दिवस १३

by Ideafest

डोळयात उतरले पाणी, पाण्यावर डोळे फिरती.
दुःखाचा उतरला पारा, या नितळ उतरणी वरती
– ग्रेस१) कवी ग्रेस यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहिर झाला. पण कविवर्य ग्रेस यांना पुरस्कार मिळाला पण तो त्यांच्या ललित लेखासाठी. असो त्यांच ललित लेखन ही काही कमी नाही. पण सहज माझ्या मनात विचार आला.आज लोकसत्ता मधे वाचले कि जेंव्हा कवि ग्रेस यांना विदर्भ भुषण हा पुरस्कार जाहिर झाला होता त्यावेळेस त्यांनी सांगितले होते कि

“आता हा पुरस्कार घेऊन मी काय करु, जर मला हा पुरस्कार आणि हे १ लाख रुपये १० वर्षापुर्वी मिळाले असते तर मी शँपेन आणि सिगारेट ची अजुन जास्त मजा घेतली असते.”

सध्या ग्रेस दवाखान्यात कर्करोगावर उपचार घेत आहेत. ग्रेस यांच्या कवितेची ओळख प्रथम मला झाली ती म्हणजे भय इथले संपत नाही या महाश्वेता मालिकेत लतादिदींनी गायलेल्या गीतातुन, नंतर मग मी ह्र्द्यनाथांच्या भावसरगम मधे जाउ लागल्यावर मला ह्र्द्यनाथ आणि ग्रेस यांच्यातील स्नेह समजला. मला ग्रेसच्या कवितेची ओळख ह्र्द्यनाथांच्या संगितातुन झाली असे म्हणणे इष्ट ठरेल. ग्रेसवर टिपण्णी करायची माझी लायकी नाही पण मनात मला काही साठवुन ठेवायचे नाही म्हणुनच तर इथे टोपणनावाखाली लिहितो आहे. तर ग्रेसच्या काही कविता खरोखर दुर्बोध आहेत, पण काही कविता इतक्या उच्च दर्जाच्या अभिजात आहेत कि बहुसंख्य लोकांना त्याच्या सुबोध कविता वाचुन असे वाटु लागते कि आपल्याला ग्रेस कळला आणि बाकिच्या ग्रेस न कळणार्‍या लोकांपेक्षा आपला बुध्यांक जास्त आहे. असो. पण ग्रेस सर आपले हार्दिक अभिनंदन!!! आणि आपल्या आरोग्यासाठी खुप खुप शुभेच्छा!!! लवकर बरे व्हा आणि आणखी लिहा. मला आवडणार्‍या ग्रेस च्या बर्‍याच कविता आहेत पण त्यातल्या त्यात मला आवडलेले एक कडवे –

“गाय जशी हंबरते, तसेच व्याकूळ व्हावे
बुडता बुडता सांजप्रवाही; अलगद भरूनी यावे.”
– ग्रेस२) जोवर मनातले व्यक्त होत नाही, तोवर फार घुसमट होते. मग हे व्यक्त होणे एखादया जुन्या मित्राबरोबर भडाभडा बोलणे असेल किंवा असेच एका अपरिचीताबरोबर बस मधील संभाषण असेल. एखाद्या चित्रकारासाठी व्यक्तता म्हणजे चित्र असेल, तर एखाद्या गिर्यारोहकासाठी व्यक्तता म्हणजे एखादे शिखर काबिज करणे असु शकते. कोण्या विद्वानाला रोज काही बॉद्धीक काम केल्याशिवाय अन्न गोड लागत नसेल. मला माझ्या कंपनीतील एक मॅनेजर माहित आहे, जो एक उत्तम चित्रकारही आहे. तो मला सांगायचा कि एखादया आठवड्यात कुंचला हातात घेतला नाही तर चुकचुकल्या सारखे वाटते. मी आठवड्यातुन दोनदा तरी ग्रंथालया जातो, तेथील ग्रंथपाल बांगलादेशी आहे. त्या मी भेटलो कि तो अर्धातास तरी त्याच्या भारतातल्या दिवसांबद्द्ल बोलत रहातो. व्यक्त होणे फार महत्वाचे आहे. मनाचा प्राणवायु आहे.प्रत्येक माणसाला व्यक्त व्हायचे असते. आपल्या अस्तित्वाची समोरच्या माणसाने दखल घ्यावी अशी प्रत्येकाची सुप्त इच्छा असते. सध्याच्या एवढ्या जलद गती ने धावणार्‍या जगात माणसं व्यक्त होण्याचे विसरतात, आणि त्यांना ते विसरलेत हे ही कळत नाही. मग सुरु होते नुसती घुसमट. आपण कधी विचार केला आहे का? कि माझ्या साठी व्यक्त होणे म्हणजे काय आहे? कुठल्या रुपाने व्यक्त झाल्यावर तुम्हाला स्वतःची पुनर्निर्मिती केल्याचे सुख मिळते?


३) उस्ताद बिस्मिल्लाह खानसाहेब त्यांच्या अंतिम दिनांमधे रुग्णालयात होते. एके दिवशी त्यांनी आपला हात वर केला, त्यांच्या जवळच्यांना वाटले त्यांना पाणि वैगेरे पाहिजे असेल, म्हणुन त्यांनी जवळ जाऊन विचारले कि “क्या हुआ?”. उस्ताद्जी शांतपणे उच्चारले कि “मै मनही मन एक तान गुनगुना रहा था, भैरवी अच्छी जमी थी, तो मैंने दाद दे रहा था. इसिलिए हाथ उठाया ” आता काय बोलावे.


४) अल बिरुनि आसन्नमरणावस्तेत असताना त्याला एका गणिती प्रश्नाबद्दल जाणायचे होते. त्यासाठी त्याच्या एका मित्राला त्याने बोलावले होते. मित्राने त्याला त्या गणिताबद्दल सांगितले. आणि मग काळजी पोठी म्हणाला की अशा अवस्थेत तू हा विचार का करतो आहेस? तर बिरुनी म्हणाला ‘मी मरताना ह्या प्रश्नाचे उत्तर समजून मेलो तर बरे का न समजता मेलो तर बरे राहिल?’


५) जिमी हेंड्रिक्स हा अमली पदार्थांच्या नशेमधे नवीन अवघड चाली बनवायचा आणि गिटारने वाजवायचा, पण त्याच चाली सकाळी (नशा उतरल्यावर) तो त्याच आत्मविश्वासाने तशाच्या तशा वाजवायचा.


६) कारगिल लढ्यामधे लढलेल्या कित्येक हुतात्म्यांची बोटे मरणानंरही ट्रिगरला आवळलेली होती. हि लोके स्वत:ला एवढे अलिप्त कसे ठेवु शकतात? एवढी कर्तव्य्-निष्ठा कुठुन येते? त्यांना मरणाची भिती का नसते? का ते मरणाची भीती विसरतात. कुठेतरी वाचल्याचे आठवते कि “Courage is not absent of fear, courage is overcoming fear.” भीती सगळ्यांनाच वाटते, जो इतरांपेक्षा जास्त वेळ तग धरतो तो धाडसी असे साधे गणित असते. पण लोक प्रश्नानेच घाबरतात.


७) कंपनीने नविन नियम काढला आहे कि Office मधे internet चा वापर वैयक्तिक कारणासाठी करु नये, जो सापडेल त्याला (कंपनीतुन) कमी करण्यात येईल. त्यामुळे यापुढील पोस्ट कधी येईल सांगता येणार नाही. पण मी प्रयत्न करेन जास्तित जास्त वेळा लिहिण्याचा…

– आपला (आपल्या पासुन ६०० प्रकाशवर्षे दुर असलेला) केपलरवासी